संदर्भ : या ओळी कवी मोरोपंत यांच्या ‘केकावली’ या काव्यातील ‘भरतवाक्य’ या कवितेतील आहेत.
आशयसौंदर्य : कवी ईश्वराकडे प्रार्थना करतो की मला सदैव सज्जनांची संगत लाभावी, सज्जनांचे हितकारक बोल नेहमी कानी पडावेत, माझ्या बुद्धीवरील दोषांचे (कलंकाचे) डाग झडून जावेत आणि विषयसुखांची (इंद्रियसुखांची) आवड पूर्णपणे नाहीशी व्हावी. सद्गुणी, निर्मळ जीवनाची ही आर्त मागणी आहे.
काव्यसौंदर्य : ‘घडो – पडो – झडो – नावडो’ या अंत्ययमकामुळे रचनेला नादमाधुर्य व लय येते. ‘सुसंगति’, ‘सुजनवाक्य’ यांतील ‘सु’ च्या पुनरावृत्तीतून चांगुलपणाचा आग्रह ठसतो. ‘कलंक मतिचा झडो’ ही प्रतिमा मनाच्या शुद्धीकरणाचे सुंदर चित्र उभे करते. प्रार्थनेच्या आर्त स्वरामुळे येथे शांतरस (भक्तिभाव) प्रकट होतो.
भाषिक वैशिष्ट्ये : ही रचना पृथ्वी वृत्तात आहे. संस्कृतप्रचुर, आटोपशीर व अर्थघन शब्दरचना, प्रत्येक चरणात एकेक मागणी आणि ‘घडो, पडो’ अशी आज्ञार्थी/इच्छार्थी क्रियापदे यांमुळे ओळी गेय व सहज पाठ होण्याजोग्या झाल्या आहेत. सत्संगतीचे महत्त्व सांगणारा हा विचार आजही तितकाच मोलाचा आहे.