(नमुना उत्तर)
(i) विनंती पत्र (औपचारिक)
दिनांक : 5 जून 2025
प्रति,
मा. आयोजक,
‘क्रीडासंकुल’, नगर.
ई-मेल : sankul.nagar@gmail.com
विषय : योगासन शिबिरात आमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबाबत विनंती.
महोदय,
आपल्या ‘क्रीडासंकुल’तर्फे दि. 15 जून ते 20 जून या कालावधीत सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी योगासन शिबिर आयोजित केल्याचे निवेदन वाचले. तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि नाममात्र प्रवेश फी यांमुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे.
मी राहुल पाटील, प्रगती विद्यालय, नगर या शाळेचा विद्यार्थी प्रमुख आहे. आमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे. ‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’ हे त्यांना अनुभवातून कळावे, त्यांची शारीरिक क्षमता व एकाग्रता वाढावी, हा आमचा हेतू आहे. विद्यार्थ्यांची नावांची यादी व प्रवेश फी आम्ही आपण सांगाल त्या दिवशी जमा करू.
तरी कृपया या 50 विद्यार्थ्यांना शिबिरात प्रवेश द्यावा आणि सोबत आणावयाचे साहित्य (सतरंजी, गणवेश इ.) याबाबत कळवावे, ही विनंती.
आपला नम्र,
राहुल पाटील
विद्यार्थी प्रमुख,
प्रगती विद्यालय, स्टेशन रोड, नगर.
ई-मेल : rahulpatil.pragati@gmail.com
किंवा
(ii) अभिनंदन पत्र (औपचारिक)
दिनांक : 5 जून 2025
प्रति,
मा. श्री. सुनील जाधव,
शारीरिक शिक्षण शिक्षक,
प्रगती विद्यालय, नगर.
विषय : योगासन शिबिरासाठी तज्ज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन.
आदरणीय सर,
सप्रेम नमस्कार.
‘क्रीडासंकुल’, नगर यांच्यातर्फे दि. 15 जून ते 20 जून या कालावधीत आयोजित योगासन शिबिरासाठी आपली तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याची आनंदाची बातमी समजली. आमच्या शाळेचा विद्यार्थी प्रमुख या नात्याने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले हार्दिक अभिनंदन करतो.
आपण गेली अनेक वर्षे आम्हांला खेळ, व्यायाम व योगासने यांचे शास्त्रशुद्ध धडे देत आहात. आपल्या सोप्या व आपुलकीच्या शिकवण्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना योगाची गोडी लागली. आपल्या या कार्याची दखल घेतली गेली, याचा आम्हां सर्वांना अभिमान वाटतो. आपल्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर नक्कीच यशस्वी होईल.
आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला नम्र,
राहुल पाटील
विद्यार्थी प्रमुख,
प्रगती विद्यालय, स्टेशन रोड, नगर.
ई-मेल : rahulpatil.pragati@gmail.com