जनता विद्यालयात पर्यावरण दिनी ‘एक विद्यार्थी – एक झाड’ उपक्रम
महाड, दि. 6 जून (वार्ताहर) : येथील जनता विद्यालयात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन नावीन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन वनाधिकारी श्री. सुनील पाटील यांच्या हस्ते झाले.
या वेळी ‘एक विद्यार्थी – एक झाड’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात 300 देशी रोपे लावली व प्रत्येक रोपाचे पालकत्व स्वीकारले. टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेल्या कुंड्यांचे प्रदर्शन, ‘प्लास्टिकमुक्त महाड’ या विषयावरील पथनाट्य आणि कापडी पिशव्यांचे वाटप हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. सायकल फेरी काढून विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये पर्यावरण जनजागृती केली.
मुख्याध्यापिका सौ. मीना देशमुख यांनी ‘पर्यावरण रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे’ असे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.