अब्दुल हा साधा बांगडीवाला असला, तरी त्याचे कार्य थोर समाजसेवकाला शोभणारे आहे. दाजीसाहेबांनी तपोवनातील कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी अनेक बांगडीवाल्यांना विनंती केली; पण कोणीही तयार झाले नाही. अब्दुलने मात्र स्वतःहून येण्याचे आश्वासन दिले आणि दरवर्षी संक्रांतीला व ज्येष्ठ पौर्णिमेला न बोलावता, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता तो तेथे जात राहिला.
स्वतःचे दुकान बंद ठेवून, धंद्याचे नुकसान सोसून, पत्नीचा राग पत्करूनही त्याने हे काम सोडले नाही. समाजाने दूर ठेवलेल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला लाखमोलाचा वाटे; तपोवनातील स्त्रियांना तो देवदूतासारखा वाटे. तपोवन बंद होणार हे कळल्यावर तो व्यथित झाला. दाजीसाहेबांनीही त्याच्या या मानवसेवेला ‘अनमोल’ म्हणून त्याचा सत्कार केला. यावरून अब्दुल खरोखरच थोर समाजसेवक आहे, हे सिद्ध होते.