कवितेतील सूर्य हा दिवसभर जगाला प्रकाश देणारा, जगाचे भले करणारा आहे. मावळतीला जाताना तो अस्वस्थ होतो; आपण गेल्यावर सारी पृथ्वी अंधारात बुडून जाईल, जगाचे भले कसे होईल, या चिंतेने त्याचे डोळे पाणावतात. ‘कोणी तरी या पृथ्वीला वाचवा’ असे तो आवाहन करतो.
कोणीच पुढे येत नाही; पण छोटी पणती पुढे येऊन ‘माझ्या तेजाने जमेल तशी धरा उजळून टाकीन’ असे नम्रपणे सांगते, तेव्हा सूर्य समाधानी होतो. आपले कार्य पुढे चालू राहणार याची खात्री पटल्यावर तो तृप्त मनाने अस्ताला जातो. यावरून सूर्य हा जगाची काळजी करणारा, कर्तव्यनिष्ठ आणि उदार मनाचा आहे, असे दिसते.