आशयसौंदर्य : ‘रंग मजेचे रंग उद्याचे’ ही कविता कवयित्री अंजली कुलकर्णी यांची आहे. संगणकयुगातही माणसाने मातीशी आणि निसर्गाशी नाते जपावे, पर्यावरण जपले तर जगण्याचा खराखुरा आनंद मिळेल, हा विचार कवितेत आहे. या ओळींत कवयित्री म्हणते, आपल्या भोवतीची मने हिरवी, म्हणजे निसर्गप्रेमी, प्रसन्न आहेत. हिरव्या रंगाच्या असंख्य छटा भोवताली दिसतात. पानांच्या रेशमी सळसळीच्या गोष्टी आपण सर्व जगाला सांगू.
काव्यसौंदर्य : ‘हिरवी मने’ ही सुंदर प्रतिमा आहे; झाडांचा हिरवा रंग माणसांच्या मनात उतरला आहे, अशी कल्पना आहे. ‘गर्भरेशमी सळसळ’ या शब्दांतून पानांच्या आवाजाचे नाजूक, मुलायम चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. निसर्गाचा हा आनंद स्वतःपुरता न ठेवता जगाला सांगायचा आहे, म्हणजे पर्यावरणप्रेमाचा संदेश सर्वदूर पोहोचवायचा आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : ‘हिरवी हिरवी’ या द्विरुक्तीमुळे हिरवेपणाची गडद जाणीव होते. ‘गोष्टी’ या शब्दाचे कवितेतील ‘सृष्टी, पुष्टी, वृष्टी’ यांच्याशी यमक साधले आहे. भाषा सहज, नादमय आणि गेय आहे. निसर्गाचे चित्रण असल्याने शांतरस प्रकट होतो.