आशयसौंदर्य : ‘हिरवंगार झाडासारखं’ ही कविता कवी जॉर्ज लोपीस यांची आहे. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती यांचे वर्णन करून झाडासारखे ताजे, प्रफुल्लित जगावे, असा संदेश कवितेत दिला आहे. या ओळींत कवी म्हणतात, झाडांच्या पानांवरचे दवांचे टपोरे थेंब अलगदपणे वहीच्या पानावर उतरतात. म्हणजे झाडांकडून मिळालेली ताजेपणाची, सौंदर्याची अनुभूती कवीच्या लेखनात उतरते.
काव्यसौंदर्य : ‘झाडाचे पान’ आणि ‘वहीचे पान’ या दोन ‘पानां’चा सुंदर मेळ कवीने घातला आहे. दवबिंदू हे निसर्गाच्या शुद्धतेचे, ताजेपणाचे प्रतीक आहेत; ते वहीवर उतरतात म्हणजे निसर्गातून कवीला प्रेरणा मिळते आणि त्यातूनच कविता जन्म घेते. ‘अलगद’ या शब्दातून या प्रक्रियेचा नाजूकपणा जाणवतो.
भाषिक वैशिष्ट्ये : कविता मुक्तछंदात आहे. भाषा साधी, चित्रदर्शी आहे. ‘पान’ या शब्दाचा दोन अर्थांनी केलेला वापर लक्षवेधी आहे. ‘दवांचे टपोरे थेंब’ ही प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. निसर्गाचे शांत, प्रसन्न चित्रण असल्याने शांतरसाची अनुभूती येते.