Answer: (नमुना उत्तर) औपचारिक पत्र – (i) रोपांची मागणी किंवा (ii) अभिनंदन.
(i) रोपांची मागणी करणारे पत्र
दिनांक : 12 जून 2024
प्रति,
मा. व्यवस्थापक,
आम्रपाली रोपवाटिका,
यशवंतनगर, सांगली.
ई-मेल : amrapali06@gmail.com
विषय : वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.
महोदय,
आपल्या रोपवाटिकेतर्फे दि. 15 जून ते 20 जून या कालावधीत शालेय संस्थांना फळे, फुले व उपयुक्त झाडांची रोपे मोफत वाटण्यात येणार असल्याचे निवेदन वाचले. ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ हा विचार प्रत्यक्षात आणणारा हा उपक्रम आम्हाला फार आवडला.
आमच्या ज्ञानदीप विद्यालयात दि. 1 जुलै रोजी कृषिदिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आम्हाला पुढील रोपांची आवश्यकता आहे :
(1) आंबा, पेरू, चिकू, जांभूळ यांसारख्या फळझाडांची रोपे – 40
(2) मोगरा, जास्वंद, गुलाब, चाफा यांसारख्या फुलझाडांची रोपे – 30
(3) कडुलिंब, वड, पिंपळ, करंज यांसारख्या उपयुक्त झाडांची रोपे – 30
शाळेचे शिक्षक व विद्यार्थी दि. 17 जून रोजी सकाळी 10 वाजता रोपे नेण्यासाठी येतील. लावलेल्या प्रत्येक रोपाची जबाबदारी एका विद्यार्थ्याकडे देऊन आम्ही त्यांचे वर्षभर संवर्धन करणार आहोत. कृपया आमची मागणी स्वीकारावी, ही विनंती.
आपला नम्र,
मधुर कुलकर्णी
विद्यार्थी प्रतिनिधी,
ज्ञानदीप विद्यालय, सांगली.
ई-मेल : madhur.dv@gmail.com
(पत्र मधुरा कुलकर्णी लिहीत असल्यास ‘आपली नम्र, मधुरा कुलकर्णी’ असे लिहावे.)
किंवा (ii) अभिनंदन करणारे पत्र
दिनांक : 22 जून 2024
प्रति,
मा. व्यवस्थापक,
आम्रपाली रोपवाटिका,
यशवंतनगर, सांगली.
ई-मेल : amrapali06@gmail.com
विषय : रोपे वाटपाच्या उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन.
महोदय,
आपल्या रोपवाटिकेने दि. 15 जून ते 20 जून या काळात शालेय संस्थांसाठी फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप केले. आमच्या ज्ञानदीप विद्यालयालाही आपल्याकडून शंभर रोपे मिळाली. त्याबद्दल विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो व आभार मानतो.
पावसाळ्याच्या सुरुवातीला रोपे वाटून आपण योग्य वेळी वृक्षारोपणाला चालना दिली. सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्या संस्थेला बक्षीस जाहीर केल्यामुळे रोपे फक्त लावली जाणार नाहीत, तर ती जगवली जातील. वाढते प्रदूषण आणि घटती वनसंपदा यांच्या काळात असा उपक्रम खरोखरच अनुकरणीय आहे. आपल्या रोपवाटिकेने दरवर्षी हा उपक्रम राबवावा, ही विनंती. आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!
आपला नम्र,
मधुर कुलकर्णी
विद्यार्थी प्रतिनिधी,
ज्ञानदीप विद्यालय, सांगली.
ई-मेल : madhur.dv@gmail.com