कृती १. (अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)
(१) कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे – (२)
[आकृती : एका रेषेतून दोन बाण निघून (य) आणि (र) अशा दोन रिकाम्या चौकटींकडे जातात.]
(२) जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र – (२)
[आकृती : एका रेषेतून दोन बाण निघून (य) आणि (र) अशा दोन रिकाम्या चौकटींकडे जातात.]
कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते; पण आहेच वाहन तर चार-सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत?
वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल, तर तातडीचा भाग म्हणून कधी तरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल, तर वाहनाचा उपयोग होईल; पण सहज आणि सुखाने येणे-जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत.
(३) स्वमत अभिव्यक्ती – (४)
‘जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो,’ – हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
किंवा
‘मनाचा ब्रेक - उत्तम ब्रेक’ याबाबतची तुमची भूमिका सोदाहरण लिहा.